तुम्ही चिंता करू नका, योग्यवेळी निर्णय घेईन. पण तुम्ही निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवड्यातील आमदारांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
ग्रामीण भागात निवडणुका लढण्याची पक्षाची तयारी नसल्यामुळे सत्तेतून बाहेर पडू नका, हे सांगण्यासाठी आमदार सुभाष साबणे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवारी मातोश्रीवर भेट घेतली. ठाकरे आणी आमदार यांची बैठक झाली. सर्वच आमदारांनी सत्तेतून बाहेर न पडण्याची मागणी केली. मध्यावधी निवडणूक पक्षाला परवडणारी नाही. ग्रामीण भागात निवडणूक लढण्याची पक्षाची तयारी नाही. संघटना नव्याने बांधण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत सत्तेतून बाहेर पडण्याआधी त्याचा पक्षाला कसा आणि किती फटका बसू शकतो, याचा विचार करावा, अशी विनंती आमदारांनी केली.
त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुम्ही चिंता करू नका, योग्यवेळी योग्य निर्णय घेईन, असे आमदारांना सांगितले. तसेच निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी दिले. मात्र या बैठकीत सत्तेतून बाहेर पडण्याच्या विषयावर कोणतीच चर्चा झाली नाही. बैठकीत केवळ संघटनात्मक बांधणीवर चर्चा झाल्याचे मराठवाड्यातील आमदारांनी सांगितले.
COMMENTS