गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेतील सुपरस्टार रजनिकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत माध्यमातून बातम्या येत आहेत. काही दिवसांपापूर्वी त्यांनी तामिळनाडू राज्याचा दौरा केला. तब्बल 9 वर्षानंतर ते आपल्या चाहत्यांशी भेटले. राज्यभर दौरा केल्यामुळे आणि राजकारणात आलो तर चांगल्या लोकांनाच फक्त सोबत ठेवीन असं वक्तव्य केल्यामुळं रजनिकातं हे राजकारणात पदार्पण करणार अशा चर्चांना उत आला आहे. त्यातच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार अशाही चर्चा सुरू झाल्या. हे कमी की काय म्हणून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी रजनिकांत भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागतचं आहे असं वक्तव्य केलं. त्यामुळे तर त्यांच्या राजकारणाच्या चर्चेत आणखीनचं भर पडली. रजनिकांत स्वतःचा राजकीय पक्ष काढतील असंही बोलंलं जातंय. विशेषतः जयललिता यांच्या मृत्यूनंतर राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे. ती भरुन काढण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोलंलं जातंय. काल त्यांना पत्रकारांनी राजकारणातील प्रवेशाविषयी झेडलं असता त्यांनी योग्य वेळी राजकारणातील प्रवेशाविषयी बोलू असं सांगितलं. त्याचवेळी त्यांनी राजकारणाती प्रवेशाविषयी थेट नकारार्थी उत्तर दिलं नाही. त्यामुळे एकप्रकारे रजनिकांत यांनी राजकारणातील प्रवेशाबाबत अप्रत्यक्षपणे संकेतच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
COMMENTS