उस्मानाबाद – शेतक-यांचे कोट्यवधी रुपये थकवलेल्या शंभू महादेव साखर कारखान्याला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचं राजकीय पाठबळ असल्यामुळेच त्याच्यावर कारवाई होत नाही असा आरोप परिसरातील शेतक-यांनी केलाय. गेल्या गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचा एक पैसाही कारखान्याने शेतक-यांना दिलेला नाही. पैशांसाठी रोज शेतकरी कारखान्यावर हेलपाटे मारत आहेत. तरीही त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. तर पैशासाठी कोणी शेतक-याने तगादा लावला तर त्याला तिथून हुसावून लावलं जात असल्याचाही आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळेच वैतागलेले हे शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पैसे दिले नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षी तुरळक साखर कारखाने सुरू होते. यातील शंभु महादेव साखर कारखान्याने 25 हजार टनाचे गाळप केले. जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यातूनही ऊस गाळपासाठी आणला होता. परंतु, सहा महिन्यानंतर शेतकऱ्यांना दमडीही दिलेली नाही. कारखान्याचे चेअरमन दिलीपराव आपेट हे ग्रामविकासमंत्री पंकजा मुडे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये थकवूनही त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप होतोय. कारखाना स्थळावर ठिया आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे.
COMMENTS