मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज (11 ऑक्टोबर) 75 वा वाढदिवस आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना वाढदिवसाच्या व्यंगचित्राद्वारे चित्रमय शुभेच्छा दिल्या आहेत.
राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी काही शब्द लिहले आहेत…
अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस.
पंच्याहत्तर वर्षांचे झाले ते.
शतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे.
१९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या. बच्चन यांच्या सिनेमांनी पाच पिढ्यांवर गारुड टाकलं.
इतर अनेक कलावंत आले आणि निसर्गाच्या नियमानुसार मावळलेसुद्धा. अमिताभ बच्चन मात्र आजही या देशाच्या मातीत, इथल्या लोकसंस्कृतीत पाय घट्ट रोवून उभे आहेत. अन् तेवढ्याच तडफेनं आणि ऊर्जेनं काम करत आहेत. हे पाहिलं की, विजय तेंडुलकरांच्या पुस्तकाचं शीर्षक आठवतं :
‘हे सर्व कोठून येतं?’
काही वर्षांपूर्वी माझा अमिताभ बच्चन यांच्याशी वाद झाला. त्याचं स्पष्टीकरण मी दिलंय. माझी भूमिका मराठी भाषेच्या संदर्भात होती. आजसुद्धा ती कायम आहे. त्यांच्या समक्ष मी ती मांडली आहे हेही आवर्जून सांगतो.
इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे की लता दीदी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर ही लोकोत्तर माणसं एका राज्यापुरती मर्यादित नाहीत. ती साऱ्या भारताची आहेत.
पण मतभेद असले तरीही अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती, आजही नाही. अमिताभ बच्चन हे सिनेमा संस्कृतीचे राजदूत आहेत यावरून वाद होऊ शकत नाही.
गेल्या चाळीसएक वर्षात अमिताभ बच्चन यांनी कचकड्याच्या पडद्यावर अनेक रूपं चितारली. अगणित भूमिका सजीव केल्या. काळानुसार बदलत गेलेले त्यांचे अनेकविध चेहरे इथे सादर केले आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त.
एका एकमेवाद्वितीय कलावंताला माझ्यातल्या कलावंतानं दिलेली ही छोटीशी भेट.
ती तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो.
अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
राज ठाकरे
COMMENTS