रायगडावरील ढोल-ताशाचा कार्यक्रम रद्द, चौफेर टीकेनंतर सरकारला आली जाग

रायगडावरील ढोल-ताशाचा कार्यक्रम रद्द, चौफेर टीकेनंतर सरकारला आली जाग

शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सरकारनं 11 एप्रिलला ढोल वादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावरून सध्या सरकारवर चांगलीच टीका होत आहे. कार्यक्रमाची पत्रिका जाहीर होताच ती सोशल मीडियावरून व्हायरल झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून विनोद तावडेंची चांगलीच खिल्ली उडवत पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला ढोल-ताशा वाजवण्याचा कार्यक्रम कसा आयोजित केला जाऊ शकतो, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

शिवाजी महाराजांचा स्मृतीदिन हा 3 एप्रिलला पाळला जातो. त्यानिमित्त 11 एप्रिलला रायगडावर एक हजार ढोल वाजवून शिवाजी महाराजांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम रायगडावर आयोजित करण्यात आला होता. आधीच शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून राजकारण्यांनी घोळ घालत तिथीनुसार आणि तारखेनुसार जयंती साजरी करण्याची प्रथा पाडली आहे. आता स्मृतीदिनालाही तारखांचा घोळ केला असल्यानं या मुद्यावरूनही विनोद तावडेंवर चांगलीच टीका होत आहे.

कार्यक्रमाची पत्रिका सध्या सोशल मीडियावरून चांगलीच व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम राज्यसरकारनं आयोजित केला होता. यात संयोजक म्हणून सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचं नाव होतं. तर सहआयोजक म्हणून श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचं नाव होतं. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असणार होती, सोबतच या कार्यक्रमाला राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनाही आमंत्रित केलं गेलं होतं.

या कार्यक्रमावरून सोशल मीडियात सरकारला चांगलंच धारेवर धरलं जात आहे. अखेर सोशल मीडियावरची टीका बघून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

COMMENTS