राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांमध्ये शरद पवार यांच्या नावावर एकमत होत असतना आता सरकारमधील घटकपक्ष शिवसेनेनंही पवार यांच्याच नावाला पंसती दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे. भाजपनेही पवारांना पाठिंबा द्यावा असंही राऊत म्हणाले. राष्ट्रपतीपदासाठी शरद पवार हे अत्यंत योग्य आणि सक्षम उमेदवार असल्याचही राऊत म्हणाले. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे पवारांच्या नावाला पसंती वाढली आहे. शिवसेनेनं याआधी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी सरसंघचालक मोहन भागवत यांचं नाव सुचवलं होतं. मात्र भागवत यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेननं आता पवारांचं नाव पुढं केलं आहे.
डाव्या पक्षांनी शरद पवार यांचं नाव राष्ट्रपतीपदाचे विरोधकांचे उमेदवार म्हणून पुढं केलं आहे. त्यादृष्टीनं त्यांनी समविचारी पक्षांशी बोलणीही सुरू केली आहे. पवार यांना उमेदवारी दिल्यास ते एनडीएची मते खेचू शकतील तसंच शिवसेनाही पवारांना पाठिंबा देईल अशा डाव्या पक्षातील नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी पवारांचं नाव पुढं केलं आहे. त्यांचा अंदाजही खरा ठरताना दिसत आहे. त्यामुळे शरद पवार आता याबाबत काय भूमिका घेतात याकडं सगळ्यांच लक्ष लागलं आहे. की विरोधकांचा डाव हाणून पाडण्यासाठी भाजपचं पवारांची उमेदावारी जाहीर करणार की अन्य उमेदवार देणार याकडंही लक्ष लागलंय.
COMMENTS