आपल्यापैकी अनेक लोक हे ट्रेनने प्रवास करतात. पण धावपळीमध्ये ट्रेन सुटण्याच्या भितीने अनेकजण विनातिकीट ट्रेनमध्ये चढतात आणि त्यानंतर तिकीट चेकरने पकडल्यास दंड भरावा लागतो. पण विना तिकीट रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी आता एक चांगली बातमी आहे. कारण, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि रेल्वेचे नुकसान होऊ नये म्हणून रेल्वेने आता एक नवा उपाय शोधून काढला आहे.
एप्रिल महिन्यापासूनच रेल्वेने विना तिकीट प्रवास करणा-या प्रवाशांना रेल्वेतच तिकीट देण्याची व्यवस्था सुरु केली आहे. तिकीट मिळविण्यासाठी प्रवाशांना टीटीईसोबत संपर्क करावा लागेल. टीटीईला आपण तिकीटाशिवाय प्रवास करत असल्याचं सांगितल्या तुम्हाला लगेचच तिकीट उपलब्ध करुन देण्यात येईल.
विना तिकीट रेल्वेने प्रवास करणा-या रेल्वे प्रवाशांना सर्वातआधी टीटीईशी संपर्क करावा लागेल. त्यानंतर टीटीई संबंधित रेल्वे प्रवाशाला तिकीटाच्या शुल्काव्यतिरिक्त 10 रुपये अतिरिक्त शुल्क घेऊन आपल्या हातातील मशिनवरून तिकीट काढून देईल. या सुविधेसाठी रेल्वे प्रवाशांना रेल्वेत चढताच टीटीईला सांगावे लागेल की, मी तिकीट खरेदी केलेलं नाहीये. जर तुम्ही टीटीईला कळवले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. टीटीईकडे असलेली हँड हेल्ड मशीन रेल्वे पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमच्या सर्व्हरसोबत कनेक्ट असेल. ज्याक्षणी रेल्वे प्रवाशी तिकीट मागेल त्यावेळी त्याचं नाव, लोकेशन मशीनमध्ये इंटर करताच त्याला तिकीट उपलब्ध होईल. या मशीनच्या माध्यमातून रेल्वेतील रिकाम्या सिट्स म्हणजेच रिकाम्या बर्थ संदर्भातील माहितीही सहज उपलब्ध होणार आहे. सध्या ही सुविधा सुपरफास्ट ट्रेन्समध्ये लागू करण्यात आली आहे. यानंतर हळूहळू लांब पल्ल्याच्या ट्रेन्समध्येही अशाच प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
COMMENTS