दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरण होण्याचा प्रश्नच नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. पक्षाचे सरचिटणीस डी पी त्रिपाठी यांनी विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही के थॉमस यांनी काँग्रेस विचारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस यासारख्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं असं आवाहन केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार हे उमेदवार नसतील असंही पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्रिपाठी यांनी स्पष्ट केलं. पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते त्याच पदावर कायम राहतील असंही त्यांनी सांगितलं. सत्ताधारी पक्षाला राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार जिंकण्यासाठी 15 हजार मतांची कमतरता आहे. त्यामुळे सहमतीचा उमेदवार म्हणून सत्ताधारी पक्षातर्फे पवारांचं नाव पुढे केलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे. त्यावर त्रिपाठी यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. सत्ताधारी पक्षाने विरोधकांशी चर्चा केली तर सहमतीचा उमेदवार देण्याबाबत विचार करु असंही त्रिपाठी यांनी सांगितलं.
COMMENTS