वृक्षारोपण मोहीम जनचळवळ बनली आहे – सदाभाऊ खोत

वृक्षारोपण मोहीम जनचळवळ बनली आहे – सदाभाऊ खोत

वृक्ष लागवडीची संकल्पना यापूर्वी सामाजिक वनीकरण विभाग व वनविभाग राबवत असे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून राज्य सरकराने यामध्ये नागरिकांना सामावून घेतले. त्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. त्यामुळेच वृक्षारोपणाची ही मोहीम जनचळवळ बनली आहे असे उद्गार कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी काढले आहेत.

वाळवा तालुक्यातील पेठ परिसरात सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आणि मरळनाथपूर येथे वन विभागाच्या वतीने वृक्षारोपण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, गेल्या दोन वर्षात साहित्यिक, कलाकार, राजकीय,  सामाजिक क्षेत्रातील नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनात सर्व स्तरातील नागरिकांनी योगदान दिले आहे, असे त्यांनी सांगितले.

उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा म्हणाले, ही मोहीम 7 जुलै पर्यंत राबविली जाणार आहे. पहिल्या दिवशी 1 लाख 33 हजार 396 झाडे जिल्ह्यात लावण्यात आली. सर्व स्तरातील नागरिकांनी, महिलांनी, विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी मरळनाथपूर येथील वन विभागाच्या जागेवर 2 हजार 780 झाडे लावण्याच्या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते जांभूळ, चिंच, आंबा व अन्य फळझाडांचे रोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS