मुंबई – शिवसेना-भाजप युती ‘व्हेंटिलेटर’वर आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला असता, त्यांनी या प्रश्नाचे मिश्किलपणे उत्तर दिले. शिवसेना-भाजप युती कासवगतीने पुढे जातेय, अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते मराठी कलाकार ‘मातोश्री’वर ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. ‘व्हेंटिलेटर,’ ‘कासव’ यासारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांवर या आपली कलाकारांनी आपली छाप टाकली आहे. हाच योग साधत ‘व्हेंटिलेटर’वर असलेली शिवसेना-भाजप युती आता पूर्वपदावर येणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘शिवसेना-भाजप युती ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहे’ असे उत्तर त्यांनी दिले.
यावेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक, कलाकार यांचे कौतुक सेनेच्यावतीने करण्यात आले. या चित्रपटांचा एक महोत्सव एप्रिल महिन्याच्या अखेरीस शिवसेना चित्रपट शाखेच्यावतीने मुंबईत आयोजित करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मराठी कलाकारांचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्हाला मराठी कलाकारांचा अभिमान वाटतोय. या कलाकारांचे जगात कौतुक होत आहे. मात्र, त्यांचे कौतुक घरात होणे आवश्यक आहे.’
कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा मुद्दाही यावेळी चर्चिला गेला. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही. पाकिस्तानला इशारे देऊन चालणार नाही. आता थेट कारवाई करुन दाखवावी लागेल. शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करते तेव्हा लोक आमच्यावर टीका करतात. मात्र, अशी काही घटना झाली की लोकांचे देशप्रेम जागे होते.’ यावेळी ‘कासव’ आणि ‘व्हेंटिलेटर’च्या टीमचे उद्धव ठाकरे यांनी सत्कार केला.
COMMENTS