राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानाला आज यात्रेचं स्वरूप आलं होतं. आज झालेल्या दिवाळी भेट कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी झुंबड झाली होती. शरद पवार यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत येणारं वर्ष सुखासमृद्धीचं जावो अशा सदिच्छा दिल्या. वर्षातून एकदा संपूर्ण पवार कुटुंबियांना भेटण्याची संधी उपलब्ध होत असल्यानं कार्यकर्त्यांनी पहाटेपासूनच गोविंद बागेसमोर गर्दी करत दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शरद पवारांच्या निवासस्थानाला यात्रेचं स्वरूप आले.
दीपावलीच्या निमित्तानं अनेक कार्यकर्त्यांसह नेतेही बारामतीत दाखल झाले होते. केवळ राष्ट्रवादीचेच नव्हे तर सर्वपक्षीय कार्यकर्ते आवर्जून शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी येतात. त्यामुळं गोविंद बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानाला यात्रेचं स्वरूप प्राप्त होतं. आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील विविध आमदार, खासदार व अन्य नेत्यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.
COMMENTS