मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेतली. या भेटीमागचं कारण समजू शकलं नाही. मात्र शिवसेनेकडून भाजपवर वाढलेले हल्ले आणि त्यातच एकनाथ खडसे यांनी कधीही मध्यावधी निवडणुका लागू शकतात असं धुळ्यात वक्तव्य केल्यामुळं पवार – फडणवीस भेटीबाबत तर्कवितर्क काढले जात आहेत. भाजपमधूनही अंतर्गत पातळीवर मध्यावधी निवडणुकीची तयारी केली जात असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्व आहे. खरंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं भाजप सरकारविरोधात संघर्ष यात्रा काढून जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शेतक-यांच्या असंतोषाला खतपाणी घालण्याचं काम केलं आहे. दोन्ही काँगेसमध्ये कधीनव्हे एवढा एकोपा बघायला मिळतोय. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी काँगेस भाजपला पाठिंबा देईल अशी शक्यता नाही आणि भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेईल अशीही शक्यता नाही. केवळ शिवसेनेमधील अस्वस्थता वाढवण्याची खेळी या भेटीमागे असू शकते. एकीकडे शिवसेनेचं पक्षनेतृत्व सरकारविरोधात भूमिका घेत असताना या भेटीमुळे शिवसेनेच्या आमदारांमध्ये चलबिचल होऊ शकते. यासाठी तर ही भेट नाही ना ? अशी खमंग चर्चा राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे.
COMMENTS