शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्यावर काल रात्री भाजपकडून शाइफेक करण्यात आल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत डोंबिवली पूर्वेतील भाजप कार्यालयावर हल्लाबोल करीत आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी तब्बल 4 तास डोंबिवली पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.
शहरप्रमुख भाऊ चौधरी यांच्यावर भाजपकडून शाईफेक झाल्याच्या प्रकाराची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि शिवसेनेचे आमदार, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठा जमाव डोंबिवली मध्यवर्ती शाखेत जमला. रात्री 11 नंतर रस्त्यावर उतरत या संतप्त जमावाने भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा पुतळा जाळला. मग डोंबिवली पोलीस ठाण्यावर जाताना वाटेत असणाऱ्या भाजप शहर कार्यालयाला आपले लक्ष केले. मात्र कार्यालय बंद असल्याने त्याचा बोर्डवर संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक केली. मग आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी डोंबिवली पोलीस ठाणे गाठत त्याठिकाणी तब्बल 4 तास आपला ठिय्या मांडला. शाईफेक करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातच ठाण मांडण्याचा आक्रमक पवित्रा शिवसैनिकांनी घेतला. शिवसेनेच्या या संतप्त भूमिकेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे पोलीस ठाण्यात दाखल झाले. शिंदे यांनी उद्याच्या (शुक्रवारी)दिवसात पोलिसांनी आरोपींना अटक न केल्यास शनिवारी शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन सुरू करेल असा अप्रत्यक्ष इशाराच पोलिसांना दिला. मात्र पोलिसांनी कारवाईचे ठोस आश्वासन दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांची समजूत काढली. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांचा हा जमाव पोलीस ठाण्यातून बाहेर पडला.
यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर, स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, सभागृह नेते राजेश मोरे, महानगरप्रमुख विजय साळवी, डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक नगरसेवक, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथमधील सेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
COMMENTS