तामिळनाडू राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘वंदे मातरम्’ गायलाच हवे. आठवडय़ातून किमान एकदा तरी हे राष्ट्रीय गीत गायलाच हवे, असे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.
के. वीरामणी यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मद्रास उच्च न्यायालयाने राज्यातील शाळांमध्ये आठवड्यातून एकदा म्हणजे सोमवार किंवा शुक्रवार आणि कार्यालयांमध्ये महिन्यातून एकदा तरी राष्ट्रगान गायले गेले पाहिजे, असे नमूद केले.
‘विद्यार्थी आठवड्यातून एकदा तरी ‘वंदे मातरम’ म्हणतील याची खबरदारी सरकारी व खासगी शाळांनी घ्यावी. तसेच सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये एकदा तरी राष्ट्रगान गायले जावे. नागरिकांना बंगाली वा संस्कृतमधून ‘वंदे मातरम’ म्हणणे कठीण असेल तर ते तमिळमध्ये भाषांतरित करण्यासंबंधी उपाययोजना करण्यात येतील’ असे मुरलीधरन यांनी सुनावणी दरम्यान सांगितले.
‘मात्र एखादी व्यक्ती वा संस्थेला राष्ट्रगान गाण्यास समस्या येत असेल तर त्यांना (तसे करण्यास) कोणीही भाग पाडू नये. मात्र त्यासाठी त्यांना योग्य स्पष्टीकरण द्यावे लागेल’ असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारी संकेतस्थळे आणि सोशल मीडियावर इंग्रजी व तमिळ भाषेत ‘वंदे मातरम’ अपलोड करण्याचे आदेश मद्रास उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले.
COMMENTS