शिवसेना शहरप्रमुखांवर भाजप पदाधिकाऱ्यांनी फेकली शाई

शिवसेना शहरप्रमुखांवर भाजप पदाधिकाऱ्यांनी फेकली शाई

शिवसेना आणि भाजपच्या एकमेकांविरोधातील निदर्शनांनी उग्र रूप धारण केल्याचे दिसून आले. भाजप प्रदेशाध्यक्षांविरोधात तीव्र आंदोलन केल्याने संतप्त झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी थेट शिवसेना डोंबिवली शहरप्रमुखांवर शाई फेकल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भाजपच्या कार्यकर्ता बैठकीतील तुरडाळीबाबतचे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ते वक्तव्य समोर आले. आणि सर्वच स्तरातून टिकेची एकच झोड उठली. मग सत्तेत भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेली शिवसेना त्यात मागे कशी राहणार. त्यांना तर भाजपला कोंडीत पकडण्याचा हा आयताच मुद्दा हाती लागला. मग शिवसेना डोंबिवली शाखेतर्फे भाजप प्रदेशाध्यक्षांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. सेनेच्या या निदर्शनांनंतर मग संध्याकाळी भाजपनेही सामना वृत्तपात्राची होळी करून सेनेला शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपचे बहुधा या आंदोलनावर समाधान झाले नसावे. म्हणून की काय गुरुवारी रात्री 8.30 ते 9 च्या सुमारास भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊ चौधरी यांना त्यांच्या घराखाली गाठले. आणि त्यांच्या अंगावर शाई ओतून आपला रोष व्यक्त केला. भाजपकडून अचानक आलेल्या या अशा प्रतिक्रियेमुळे सेनेमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS