शिवसेनेची फलक लावून नारायण राणेंवर खालच्या भाषेत टीका

शिवसेनेची फलक लावून नारायण राणेंवर खालच्या भाषेत टीका

मुंबई – काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेने वरळीत लावलेल्या एका फलकामधून राणेंवर अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना आणि नारायण राणे आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हा फलक लावला आहे. भोसले यांनी राणे यांच्या नव्या राजकीय वाटचालीवर व्यंगात्मक भाष्य करणारा फलक लावल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. राणेंनी काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन न पाळल्यामुळे पक्षातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते. यावरच या फलकात इच्छा माझी पुरी करा. अशा आशयाचा मजकूर लिहून राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

या फलकात भाजपलाही लक्ष्य करण्यात आले आहे. यात  रेखाटण्यात आलेली चित्रे आणि त्यातील भाषा वादग्रस्त आहे. राणेंनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर शिवसेनेने प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते, मात्र, आता फलक लावून शिवसेनेने राणेंच्या विरोधात व्यंगात्मक प्रतिक्रिया दिली आहे. राणेंचा भाजप प्रवेश झाल्यास हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

 

COMMENTS