सांगली – ‘हातकणंगले मतदारसंघाबाहेर निवडणूक लढवून दाखवा, म्हणजे तुमची ताकद समजेल’ असे आव्हान राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिले आहे. सांगलीत ते पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टींनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सदाभाऊंना मंत्रीमंडळातून काढण्याची विनंती केली आहे. म्हणजे त्यांना खर्या अर्थाने सदाभाऊ क्लेश झाला आहे. मी मंत्रीपदावर आहे हिच मोठी असूया त्यांच्यात निर्माण झाली आहे. परंतु मला गावातील शेतकर्यांनी उभे केले आहे. शेतकर्यांनीच मला घडवले आहे. त्यामुळे माझ्या आयुष्याचा निर्णय हा शेतकरीच घेईल. तो अधिकार इतरांना नाही. सत्तेच्या बाबतीतला निर्णय मुख्यमंत्री घेतील आणि त्यांचा निर्णय मला मान्य असेल. खासदार राजू शेट्टी माझे मालक नाहीत किंवा मी त्यांचा गुलाम नसल्याचे खोत यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात जाऊन मी पाच लाख मते घेतली. शेट्टींनी हातकणंगले मतदारसंघाबाहेर जाऊन उभे राहून तिथे मते घेऊन दाखवावीत. मग कळेल समाजात कुणाची किती पत आहे. तसेच त्यांनी दुसरा उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघात उभा करुन दाखवावा आणि एक लाख मते घ्यावीत, मग समजेल तिथे कोणाची किती ताकद आहे. माझ्या नव्या संघटनेचं नाव आणि झेंडा लवकरच स्पष्ट करु. यापुढे आयुष्यभर शेतकर्यांसाठी लढत राहणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
COMMENTS