शेतकरी कर्जमाफीच्या मदतीसाठी स्वतंत्र बॅंक खाते

शेतकरी कर्जमाफीच्या मदतीसाठी स्वतंत्र बॅंक खाते

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यात आपलेही योगदान असावे या भावनेने विविध व्यक्ती आणि संस्था पुढे येत आहेत. त्यादृष्टीने कर्जमाफीसाठी देण्यात येणाऱ्या विशेष आर्थिक देणग्या स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खाते सुरू करण्यात आले आहे. संस्था आणि व्यक्ती यांनी दिलेली देणगी या खात्यामध्ये जमा केली जाणार असून या खात्यातील जमा रक्कम शेतकरी कर्जमाफीच्या योजनेसाठीच उपयोगात आणण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून भारतीय स्टेट बँकेच्या फोर्ट येथील मुंबई मुख्य शाखेमध्ये  CHIEF MINISTERS FARMER RELIEF FUND या नावाने 36977044087 क्रमांकाचे बचत खाते उघडण्यात आले आहे. या शाखेचा कोड 0030 आणि आयएफएससी कोड SBIN0000300 असा आहे. या खात्यावर इच्छूक देणगीदारांना एनईएफटी ‌अथवा धनादेशाच्या माध्यमातून पैसे जमा करता येतील.

राज्यातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वसमान्य जनतेबरोबरच विविध शेतकरी संघटना, सामाजिक तसेच खासगी संस्थांनी स्वागत केले असून या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आपलेही सहकार्य देऊ केले आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेस मदत म्हणून मुंबईतील हरमन फिनोकेम या संस्थेने नुकताच मुख्यमंत्री सहायता निधीस 25 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. तसेच राज्यातील मंत्री आणि आमदारांनीही आपले एक महिन्याचे मानधन कर्जमाफीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाच्या या योजनेस आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षांतर्गत एक स्वतंत्र बँक खाते उघडण्यात आले असून संस्था आणि व्यक्ती यांनी दिलेली देणगी या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तसेच कृषी कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेसाठी आर्थिक सहाय्यता निधी कक्षाकडून अर्थसहाय्य देण्याचा ठराव मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष न्यासाने मंजूर केला आहे. राज्यातील जास्तीत जास्त लोकांनी शासनाच्या या प्रयत्नांना बळ देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे मदत द्यावी, ‌असे आवाहन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS