दुस-या दिवशी संघर्ष यात्रेला जोरदार पाठिंबा; गावोगावी शेतक-यांनी केले उत्स्फूर्त स्वागत.
राज्यातील सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे, या शेतक-यांना आत्मविश्वास आणि न्याय देण्यासाठी संघर्षयात्रा काढली असून शेतकरी कर्जमाफीसाठी लाठ्या काठ्याच नाही तर गोळ्या झेलायलाही आपण तयार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षांच्या संयुक्त संघर्ष यात्रेच्या आज दुस-या दिवशी वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे जाहीर सभेत बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
विरोधी पक्ष गेल्या दोन वर्षांपासून सभागृहात आणि सभागृहाबाहेर रस्त्यावर लढा देतायेत पण राज्यातल्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांना संवेदनाच राहिल्या नाहीत. भाजप सरकारच्या काळात ब्रिटीश आणि निजामाच्या राजवटीपेक्षा वाईट वेळ शेतक-यावर आली आहे. कर्जमाफीने फक्त बँकांचा फायदा होतो असे मुख्यमंत्री म्हणतात, मग मुख्यमंत्र्यांनी खासगी सावकारांची कर्ज माफ करून कोणाचा फायदा केला ? असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला. सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे शेतक-यांच्या लढ्यात सहभागी आहेत आणि शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी भविष्यातही एकत्र राहतील असे खा. चव्हाण म्हणाले.
यावेळी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सरकारवर जोरदार टीका केली, ते म्हणाले की, सेवाग्राममधून प्रेरणा घेऊन आम्ही शेतक-यांवर अन्याय करणा-या जुलमी सरकारला ‘चले जाव’ सांगण्यासाठी संघर्षयात्रा काढली आहे. उद्योगपतींचे १ लाख कोटींचे कर्ज माफ करताना स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य यांना काहीच वाटले नाही, मग शेतकरी कर्जमाफीबद्दलच पोटशूळ का ?असा सवाल विखे पाटील यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, सरकारकडे बुलेट ट्रेन आणायला भरमसाट पैसे आहेत,मात्र शेतक-यांना मदत करण्यासाठी पैसे नाहीत. शेतकरी विरोधी सरकारला त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. याच सभेत बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या सरकारने केले आहे. शिक्षण,कायदा-सुव्यवस्था आदी गोष्टीत हे सरकार अपयशी ठरलंय. समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आझमी यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, शेतकरी कर्जमाफी मागणा-या आमदारांना ज्यांनी निलंबीत केले त्यांना शेतकरी निलंबीत करतील. तर कर्जमाफीसाठी आंदोलन, शेतक-यांचे प्रश्न सभागृहात मांडणे गुन्हा असेल तर असे गुन्हे शंभरवेळा करणार असे आमदार सुनिल केदार यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी सकाळी सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट देऊन तसेच पवनार येथे विनोबा भावेंच्या समाधीवर वंदन करून संघर्ष यात्रेच्या दुस-या दिवसाचा प्रारंभ झाला. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील सेलू, नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी आणि कोंढाळी येथे जाहीर सभा झाल्या. या संघर्षयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात,जयदत्त क्षीरसागर, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, मधुकरराव चव्हाण,बसवराज पाटील, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार धैर्यशील पाटील, आमदार विजय वडेट्टीवार जितेंद्र आव्हाड, सुनिल केदार यांच्यासह विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते.
COMMENTS