महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. शेतकरी संपावर जात आहे ही खूप गंभीर बाब आहे. सरकारने शेतक-यांना गांभीर्याने घेतले पाहिजे. पंरतु, शेतक-यांच्या संपाबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. अॅड.वंदना चव्हाण यांनी सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण काल (दि.31) शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकरी संपाबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी येत्या दोन दिवसात चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दरवर्षी देशात 12 हजार शेतकरी आत्महत्या करत असल्याचे लेखी स्वरूपात पत्र दिले आहे. मी देशाचा कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्या होत होत्या. पण आम्ही त्याचे विश्लेषण केले असता, कर्जबाजारीपणामूळे आत्महत्या होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे 71 हजार कोटीची शेती कर्ज माफी देण्यात आली. अजूनही शेतकरी आत्महत्या वाढत आहे ही चिंतेची बाब असल्याचेही, ते म्हणाले.
COMMENTS