शेतक-यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका, भाजप आमदाराच्या वक्तव्याने विधीमंडळात प्रचंड गदारोळ

शेतक-यांना कर्जमाफी अजिबात देऊ नका, भाजप आमदाराच्या वक्तव्याने विधीमंडळात प्रचंड गदारोळ

मुंबई – शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आधीच तापलेला  असल्याने  आणि त्यामध्ये काल उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्याने राजकीय वातावरण अत्यंत गरमा गरमीचे झाले आहे. त्यामध्ये तेल ओतण्याचे काम भाजपचे आमदार प्रशांत बंद यांनी केले. शेतक-यांना अजिबात कर्जमाफी देऊ नये असे विधान बंब यांनी करताच विधानसभेत प्रंचड गदारळो घातला. बंग यांना पुढे बोलूही दिले नाही. त्यामुळे आमदार बंबही प्रंचड संतापले होते. या गोंधळात भाजपचे काही आमदार आणि मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करत शांत करण्याचे काम केले. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळताना कर्जमाफीची मागणी लावून धरली. उत्तर प्रदेशच्या सरकारने शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जे माफ करून फडणवीस सरकारने अधिवेशनातच आम्हाला त्यांचे अभिनंदन करण्याची संधी द्यावी, असे शिवसेनेचे आमदार शंभुराजे देसाई यांनी सांगितले.

दुसरीकडे विधानपरिषदेत काँग्रेस नेते नारायण राणे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी सरकारवर ३०२ कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याची भाषा करायचे. मग आता नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर सरकारवर ३०२ कलमातंर्गत नऊ हजार खटले दाखल करायचे का, असा सवाल राणे यांनी विचारला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत निवेदन सादर केले. उत्तर प्रदेशातील कर्जमाफीच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आदेश राज्याच्या वित्त सचिवांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

राज्य सरकार कर्जमाफीसाठी माहिती संकलित करण्याचे काम करत आहे. कर्जमाफी करायची की नाही हा राज्य सरकारचा निर्णय आहे. या संदर्भात आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही. आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे असे फडणवीस म्हणालेत. केंद्र सरकारने मदत दिली नाही तर त्याचे नियोजन कसे करणार, याचाही अभ्यास सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS