गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरु असलेला संप आज अखेर शेतकऱ्यांनी मागे घेतला असे जाहीर केल तरी शेतक-यांना ते मान्य नसून आज ठिकठीकाणी शेतक-यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंडवलं, असा आरोप माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
काल (शुक्रवारी) मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चार तास चर्चा केली. या बैठकीत 70 टक्के मागण्या मान्य झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला संप मागे घेतला. पण, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना गंडवले, असा थेट आरोप पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या या संपामागे काँग्रेस-राष्ट्रवादी आहे, हा आरोप म्हणजे पोरकटपणाचे लक्षण असल्याचेही ते म्हणाले. तसेच शेतकरी युद्धात जिंकला पण तहात हरला असे म्हणत पवार यांनी कर्जमाफी केवळ अल्पभूधारकांनाच का ? असा प्रश्नही उपस्थित केला. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती, अशा शब्दात पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला.
दरम्यान, हा संप मागे घेतल्याची घोषणा झाली असली तरी यावरुन शेतकरी वर्गात आता दोन गट निर्माण झाले आहेत. शेतकरी प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या चर्चेत काही सदस्यांना मॅनेज करण्यात आले, असा आरोप काही शेतकरी करत आहेत. त्यामुळे नाशिकसह अन्य काही भागातील शेतकऱ्यांनी आपला संप सुरुच ठेवला आहे. दरम्यान नाशिक व पुणतांबे येथील शेतकरी संपाच्या निर्णयावर ठाम असून त्यांचा आजही संप सुरूच आहे.
COMMENTS