श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत फारुख अब्दुल्ला विजयी

श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत फारुख अब्दुल्ला विजयी

श्रीनगर- लोकसभेसाठी श्रीनगर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला विजयी ठरले आहेत. या निवडणुकीत केवळ साडेसात टक्के मतदान झाले होते. तर काही ठिकाणी फेरमतदान घेण्यात आले होते. बडगाम या भागात मतदानादरम्यान सर्वाधिक हिंसाचार झाला होता.
या पोटनिवडणुकीसाठी 9 आणि 13 एप्रिल रोजी मतदान झाले होते. काही ठिकाणी 13 एप्रिल रोजी फेरमतदान घेण्यात आले होते. या दिवशी खूप कमी मतदान झाले होते. 34,169 अधिकृत मतदात्यांपैकी केवळ 344 मतदारांनी दुपारपर्यंत हजेरी लावली होती. त्या आधी रविवारी मतदान झाले होते. त्या दिवशी सातच टक्के मतदान झाले होते. तर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या लोकांवर दगडफेक झाली त्यामुळे मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळाला होता. रविवारी 12.61 लाख मतदात्यांपैकी केवळ 7.14 टक्क्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी एकूण 9 जण उभे होते. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे फारूख अब्दुल्ला, पीपल डेमोक्रेटिक पक्षाचे नाजीर अहमद खान हे रिंगणात होते. पीडीपी नेते तारिक हमीद यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती.

मतदानाला अल्पसा प्रतिसाद मिळाल्यामुळे केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी चिंता व्यक्त केली होती. काश्मीरमधील ही स्थिती विदारक असल्याचे सांगत ही परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही लवकरच कठोर पावले उचलू असे त्यांनी सांगितले होते.

COMMENTS