राज्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मध्यरात्री पासून बेमुदत संप पुकारला आहे. राज्यभरातील रस्त्यांवर दुधाच्या नद्या वाहत असून रस्त्यावर भाजीपाला फेकून शेतकरी आपला संताप व्यक्त करत आहेत. काही भागात तर शेतकऱ्यांच्या या संपाला हिंसक वळण ही लागले. शेतकऱ्यांचा हा आक्रमक पवित्रा बघता कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले. सरकार चर्चेसाठी तयार असून मी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण देतो, असे ते म्हणाले.
सदाभाऊ खोत यांच्या आवाहनानंतर शेतकरी संप मागे घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतीमालास हमी भाव, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा, शेतकऱ्यांना 60 वर्षांनंतर निवृत्तीवेतन आदी मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी संपावर गेले आहेत.
COMMENTS