संसदेत होणार चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

संसदेत होणार चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

आजपर्यंत संसदेत कोणत्याच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला नाही. तसेच अशा प्रकारची परवानगी याआधी कोणत्याही चित्रपटाला मिळाली नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘राग देश’ या चित्रपटाचा ट्रेलर संसदेत रिलीज होणार आहे. देशाच्या स्वतंत्र्य लढ्याला वेगळे वळण देणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या प्रसिद्ध आयएनए 1945 लाल किल्ला या खटल्यावर आधारित असलेला राग देश या चित्रपटाचा ट्रेलर संसदेत रिलीज होणार आहे. स्वातंत्र संग्रमात देशासाठी आपले प्राण पणाला लावणाऱ्या वीरांवर आधारित हा चित्रपट असून संसदेत या चित्रपटाचे ट्रेलर प्रदशित होणे हा या वीरांचा सन्मान आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया यांनी केले आहे.

येत्या 28 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा खटला आझाद हिंद सेनेच्या 3 अधिकाऱ्यांवर चालवण्यात आला होता. या अधिकाऱ्यांवर खटला सुरु झाल्यानंतर सर्व धर्मातील नागरिक एकजूट झाले. नागरिकांकडून वाढलेल्या दबावामुळे ब्रिटिश सरकारला या अधिकाऱ्यांना शिक्षा करता आली नाही. केवळ त्यांना लष्करातून काढून टाकण्यात आले. जर या अधिकाऱ्यांना शिक्षा झाली असती तर ब्रिटिश सरकारविरुद्धचा असंतोष आणखी वाढेल, अशी भिती इंग्रजांना वाटत होती. या खटल्यानंतर भारतावर अधिक काळ सत्ता राखता येणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली होती.

COMMENTS