सत्तेत उद्धव ठाकरे यांची भूमिका ‘विनोदी नटाची’ – विखे पाटील

सत्तेत उद्धव ठाकरे यांची भूमिका ‘विनोदी नटाची’ – विखे पाटील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वारंवार राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचं नाटक बंद करावं .त्यांच्या या कृतीमुळे आता महाराष्ट्रात सत्तेतील विनोदी नट म्हणून त्यांची ओळख होऊ लागली आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर विरोधी पक्ष आक्रमक भूमिका घेतांना दिसत आहे. विरोधी पक्षाने हा मुद्दा रेटाळण्यासाठी महाराष्ट्रात दोनदा संघर्ष यात्रा काढलेली असून संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला काल कोल्हापुरातून सुरुवातही झाली. काल कोल्हापुरातून निघालेल्या या संघर्ष यात्रेचं आगमन आज सांगलीत झालं. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चिमटा काढत हे वक्तव्य केलं.

 

ते म्हणाले की, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी मालिकेतील पात्र म्हणून ठाकरे शोभून दिसत आहेत. राज्यातील सर्वात भ्रष्ट महापालिका त्यांच्या ताब्यात आहे. त्याला सुरक्षा कवच मिळावे म्हणून ते सत्ता सोडण्यास तयार नाहीत. केवळ राजीनाम्याचे नाटक शिवसेनेकडून सुरू आहे. एका खासदारासाठी शिवसेना लोकसभेत उड्डाणमंत्र्यांच्या अंगावर धावून जाते, मग महाराष्ट्रातील शेतक-यांच्या प्रश्नावर ते असे का धावत नाहीत. त्यामुळे भित्रा ससा कोण आहे, हे आता लोकांनी चांगलेच ओळखले आहे. शेतक-यांच्याविषयीचा कळवळा दिखाऊपणाचा आहे. त्यांना शेतक-यांची खरीच पर्वा असती, तर राजीनामे देऊन ते बाहेर पडले असते.

 

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले की, जीएसटीसाठी विशेष अधिवेशन आयोजित करणा-या सरकारने शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन घ्यायला हवे होते. कर्जमाफी किंवा शेतक-यांना मदत करण्याऐवजी हे सरकार शेतक-यांना आणखी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘जय जवान, जय किसान’ या धोरणालाच त्यांनी हरताळ फासला. नीती आयोगाने शेतक-यांना आयकर लागू करण्याचे केलेले वक्तव्यही याचाच एक भाग आहे.

COMMENTS