स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दशरथ सावंत समितीने दिलेल्या 26 प्रश्नांच्या उत्तरात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पक्षाचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांच्यावरच दांडपट्टा फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. पक्षावर शेट्टींच्या इतकाच आपलाही अधिकार आहे. घराणेशाही, जातीयवाद, पक्षाने भाजप सरकारमधून बाहेर पडावे का? अशा सर्व अडचणींच्या प्रश्नांवर टोले लगावत नेतृत्वाच्या आत्म्याला आवाहन केले आहे. आपणास कोणताही पश्चाताप होत नसल्याने आत्मक्लेश करण्याची गरज वाटत नाही. आपण आता संघटनेलाच पूर्णविराम देत असून, यापुढे कोणत्याही समितीला सामोरे जाणार नाही, तर शेतकऱयांमध्ये जाऊ व ऑगस्टमध्ये पुढील निर्णयाची घोषणा करू, अशी भूमिका कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज जाहीर केली आहे.
राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पुण्यामध्ये चौकशी समितीशी चर्चा करण्यासाठी आज हजेरी लावली होती. समितीशी चर्चा करण्याला जाण्यापूर्वी ते म्हणाले आजपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पूर्णविराम, असं सूचक वक्तव्य केलं आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामझ्ये कोल्ड वॉर सुरु होतं. भाजपाने सदाभाऊ खोत यांना मंत्रीपद दिल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. सत्तेत सहभागी होताच खोत संघटनेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न विसरले, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. राजू शेट्टी यांनी काढलेल्या आत्मक्लेश यात्रेत खोत सहभागी झाले नव्हते. त्यावेळी, खोत यांच्याबाबतचा लवकरच निर्णय घेऊ, असं सूचक विधान शेट्टींनी केलं होतं. आता सदाभाऊ खोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजीनामा देतात ? की भाजपामध्ये प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
COMMENTS