स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चौकशी समितीने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना बाजू मांडण्यासाठी हजर होण्याची नोटीस पाठवली आहे. पुणे येथे शासकीय विश्रामगृहात 4 जुलैला चर्चेसाठी हजर राहत आपले म्हणणे मांडण्याची सूचना नोटिशीद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या कित्येक दिवसापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील खासदार राजू शेट्टी विरूध्द राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाद आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सदाभाऊंविरोधात अनेक पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत सदाभाऊंचा जाब विचारण्याची मागणी केली होती. राज्य कार्यकारिणी बैठकीनंतर राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक व वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे सदाभाऊंच्या बाबत काय निर्णय करायचा याचा दबाव कार्यकारणीवरही आला. त्यामुळे या कार्यकारणीच्या बैठकीतच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे ठरवण्यासाठी चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. या चार सदस्यीय समितीने 4 जुलैपर्यंत सदाभाऊ खोत यांची बाजू ऐकून घेत चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यामुळे 4 जुलैला सदाभाऊंची बाजू ऐकण्यासाठी संघटनेने हजर राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
COMMENTS