सलमान खानचे वडील, ज्येष्ठ लेखक सलीम खान यांनी आपल्या घरासमोरील सार्वजनिक शौचालय हटवण्याची केलेली मागणी प्रशासनाने फेटाळली आहे. त्यांनी महापौरांना यासंबंधी पत्र लिहिले होते. घरासमोरील सार्वजनिक शौचालयामुळे गैरसोय होत असल्याने ते हलवण्यात यावे, असे कारण सलीम खान यांनी महापौरांना दिले होते. मात्र, प्रशासनाने त्यांची ही मागणी फेटाळून लावत स्पष्ट नकार दिला आहे. शौचालय स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतली जाईल, मात्र ते अन्यत्र हलवले जावू शकत नाही असे सांगण्यात आले आहे.
सलीम खान यांच्या पत्राची दखल घेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पश्चिमचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना पत्र लिहून या संदर्भात कार्यवाही करण्यासंबंधी सुचवले होते. मात्र शौचालय सुरुही झाले नसताना केवळ दुर्गंधीच्या शक्यतेने रहिवासी त्याला विरोध करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.अशाप्रकारे जर प्रत्येकाने त्रास होत असल्याची तक्रार केली, तर सार्वजनिक मुतारी किंवा शौचालय उभारताच येणार नाही. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
COMMENTS