मुंबई – सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची जन्मशताब्दी वर्षानिमित्त पद्मविभूषण पुरस्कार देण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्याचबरोबर अकलुज येथे प्लॅनेटोरीअम व शिल्पसृष्टी ऊभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. सहकार विभागाने जिल्हास्तरावर सहकार परीषदांचे आयोजन करावे. साहित्य संस्कृती मंडळामार्फत शंकरराव मोहितेंच्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशीत करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे दि. 14 जानेवारी 2018 या कालवधीपर्यंत जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. सहकार व पणन, कृषी, सांस्कृतिक कार्य, सामान्य प्रशासन विभागांनी या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या उपक्रमांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा,असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर,सहकार मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री विजय देशमुख, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सहकार विभागामार्फत त्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना जे पुरस्कार देण्यात येतात त्यामध्ये शंकरराव मोहिते यांच्या नावाने नव्याने पुरस्कार या वर्षापासून द्यावा, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. कृषि विभागामार्फत अकलूज येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात यावे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. त्याचबरोबर पुणे येथील कृषि महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्रितरित्या सहकार परिषद आणि कृषि प्रदर्शनाचे आयोजन करावे. यासर्व कार्यक्रमांसाठी संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बैठकीस सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.ए. संधू, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय आदिंसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
COMMENTS