सातारा – खटाव तालुक्यात 2015 साली दुष्काळनिधी घोटाळा झाला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी तत्कालीन तहसीलदार अमोल कांबळे यांना वडूज पोलिसांनी बुधवारी सापळा रचून अटक केली होती. आज न्यायालयाकडून अमोल कांबळेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
खटाव तालुक्यात तहसीलदार पदावर काम करताना 2015 साली अमोल कांबळे याने 2 कोटी 93 लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा वडूज पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. काल पोलिसांनी सापळा रचून कांबळेला साताऱ्यात राष्ट्रीय महामार्गाजवळ अटक केली होती. वैद्यकीय तपासणीनंतर आज दुपारी अडीच वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयासमोर पोलिसांनी या प्रकरणातील आणखी दोन संशयित फरार असल्याने तसेच अपहार झालेली रक्कम कांबळेच्या नातेवाईकांच्या नावावर असल्याचा संशय असल्याने चौकशी व तपास करण्यासाठी 10 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. पोलिसांचे म्हणणे आणि सरकारी वकील अभिजीत गोपलकर यांचा युक्तीवाद ग्राह्य मानून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एम. झाटे यांनी कांबळे याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अमोल कांबळेला अटक झाल्यानंतर न्यायालय परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता.
COMMENTS