बारामती – बारामती तालुक्यातील तीन हजार मुलींना आज सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क मुलींसोबत भिगवण चौक ते गदिमा सभागृह अशी 5 कि मी सायकल चालवली. सायकल चालविल्याने प्रकृती उत्तम राहते, त्या मुळे सायकल नियमितपणे चालवा हा संदेश खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामतीत दिला.
“मी नियमितपणे सायकल चालविते. तुम्हीही सायकल चालवायला लागा,’असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. बारामती तालुक्यातील तीन हजार मुलींना सायकल वाटप कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. आज सकाळी मुलींची सायकल रॅली निघणार हे समजल्यावर सुप्रिया सुळे सकाळीच हजर झाल्या व सायकलवर बसून त्यांनी रॅली सुरु केली. त्यांच्या नेतृत्वाखालीच ही रॅली झाली. यावेळी मुलींनीही उत्साहाने रॅली सहभाग घेतला.
दरम्यान भाषणात बारामतीच्या सर्व महिला नगरसेविका रॅलीत सहभागी झाल्याचा उल्लेख करत सुळे यांनी अजित पवार यांना सांगितले की या दिवाळीत सर्व नगरसेविका आपल्या नवऱ्यांना मला दिवाळीसाठी साडी नको सायकल द्या, अशी मागणी करणार आहेत. यावर अजित पवारही मिश्किलपणे गालातल्या गालात हसले. आज सगळ्यांना सायकली मिळाल्या पण मला आणि दादाला सायकल मिळाली नाही ही खंत त्यांनी हसत बोलून दाखविली.
यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघातील पूनम राउत, स्मृति मंधाना मोना मेश्राम याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. सामान्य कुटुंबांतून आलेल्या या तिघींनी मोठी भरारी घेतली आहे. यावेळी उपस्थित विद्यार्थिनींना त्यांनी प्रोत्साहन दिले. रोटरी डिस्ट्रीक्ट 3141, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पिअर, एम्पथी फाऊंडेशन, क्रिफ्स चॅरिटेबल ट्रस्ट, स्विफ्ट इंडिया लिमिटेड या संस्थेच्या देणगीतून हे कार्य शक्य झाले आहे.
COMMENTS