हिंगोली – कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे आज (मंगळवार) जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्याकडे शासनाचे लक्ष नाही. तसेच शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे.
जिल्हयात कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने यापुर्वी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर ढोलबजाओ आंदोलन केले होते. त्यानंतरही याद्या प्रसिध्द करण्यात आल्या नाहीत. दरम्यान, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर, बाजार समितीचे सचिव रामेश्वर शिंदे पाटील केसापूरकर, नगरसेवक दिनेश चौधरी, युवासेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप घुगे, सुभाष बांगर, दिलीप बांगर, राम कदम, कडुजी भवर, कळमनुरी पंचायत समितीचे सदस्य अजय सावंत, दिनकर गंगावणे यांच्यासह शिवसेना कार्येकर्त्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढला. त्या ठिकाणी मुंडन आंदोलन केले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक एस. पी. मैत्रेवार यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले.
आठ दिवसांच्या आत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिध्द न झाल्यास आणखी तिव्र आंदोलन केले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. बांगर यांनी दिली. जोपर्यंत याद्या प्रसिध्द होणार नाहीत तो पर्यंत टप्प्या टप्प्याने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचेही श्री. बांगर यांनी म्हटले आहे.
COMMENTS