100 कोटी हिंदूंनी मोदीं सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा – सामना

100 कोटी हिंदूंनी मोदीं सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा – सामना

100 कोटी हिंदूंनी मोदीं सरकारविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा – सामना

शिवसेनेचा भाजपवरील हल्लाबोल सुरूच आहे. आता सामनामधून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय.  युनोमध्ये भारत हे धर्मनिरपेक्षा राष्ट्र असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. त्यावरुन हा हल्लाबोल करण्यात आलाय.

काय म्हटलंय सामनामध्ये ?

हिंदूंना या जगात स्वतःची म्हणून इंचभर जमीन तरी मिळणार आहे काय? देशात हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी यांची राजवट आल्यावर जगभरातील हिंदू समाजाने जल्लोष केला, पण आता मोदी सरकारने ‘युनो’त जाऊन जाहीर केले आहे, ‘‘आम्ही निधर्मी आहोत. देश धर्मनिरपेक्ष आहे!’’ हे धक्कादायक आहे. वास्तविक हिंदुराष्ट्र संकल्पनेसाठी लाखो हिंदू स्वयंसेवकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे. देशाचा सत्यानाश ‘सेक्युलर’ म्हणजे निधर्मी शब्दाने केल्याचे खापर आपण नेहमीच नेहरूंच्या टाळक्यावर फोडत राहिलो. या देशात ‘धर्मनिरिपेक्ष’ ही शिवी झाली असून समस्त हिंदूंची पीछेहाट व्हावी यासाठीच तुमच्या त्या सेक्युलरवादाचे हत्यार वापरण्यात आले. त्यामुळे दिल्लीत हिंदुत्ववाद्यांचे राज्य आल्याने सेक्युलरवादाचे दफन होईल अशी खात्रीच हिंदूंना होती, पण आपण आता ‘युनो’त जाऊन सांगितले आहे की, ‘‘हिंदुस्थान एक धर्मनिरपेक्ष देश आहे, ज्याचा कोणताही राजकीय धर्म नाही.’’ हिंदुस्थानचे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीच हिंदुस्थान सरकारच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिनिव्हा येथील मानवाधिकार परिषदेच्या अधिवेशनात बोलताना हे स्पष्टीकरण दिले. खरे तर हा देश म्हणजे हिंदुराष्ट्रच आहे. पुन्हा देशाचा आत्मा, संस्कार, संस्कृती शुद्ध हिंदुत्वाची आहे हे ठासून सांगायला आज कुणाची भीती आहे? १९४७ मध्ये धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर उरलेला देश मानायला हवे, पण पाकिस्तानच्या निर्मितीनंतरही येथे जे दोनेक कोटी मुसलमान राहिले त्यांच्या लांगूलचालनासाठी आपण स्वतःला ‘निधर्मी’ म्हणण्यातच धन्यता मानली. त्यांच्या दोन कोटींचे आज बावीस कोटी झाले व ते २२ कोटी धर्माच्या नावावर आपल्याला भारी पडत असतानाही आपण सेक्युलरवादाची बांग देत शेपूट घालणार असू तर हा देश रामाचा, कृष्णाचा आणि सोमनाथाचा उरणार नाही. हिंदुराष्ट्र म्हणजे इराणच्या खोमेनीचे, अफगाणिस्तानातील तालिबान्यांचे आणि पाक-इराकमधील ‘इसिस’चे राज्य नाही. हिंदुराष्ट्र म्हणजे येथे राहणाऱ्या सर्वांनी आपापल्या श्रद्धांची जपणूक करीत हिंदू संस्कृतीचा स्वीकार करणे. हिंदुराष्ट्र याचा अर्थ मुसलमानांसह इतर धर्मीयांनी लुंग्या आणि सूटबूट सोडून पितांबरे नेसावीत, शेंडीजानवे ठेवावे असा नाही तर त्यांनी या मातृभूमीला वंदन करावे, समान नागरी कायदा पाळावा, ‘वंदे मातरम्’चा गजर करावा व धर्मांधतेचे जोखड फेकून द्यावे असा आहे. धर्म तुमच्या घरात ठेवा, मशिदी व चर्चमध्ये राहू द्या, पण बाकी सर्व आपण एकाच हिंदुराष्ट्राचे पाईक आहोत अशी हिंदुराष्ट्राची स्वच्छ संकल्पना मांडून जागतिक व्यासपीठावर सरकारला सांगता आले असते की, ‘‘होय, आम्ही हिंदुराष्ट्र आहोत!’’ त्यात लाज कसली बाळगायची? युरोप खंडातील यच्चयावत राष्ट्रे

ख्रिश्चन राष्ट्र

म्हणून अभिमानाने मिरवतात. अमेरिका, रशियासारख्या राष्ट्रांचा धर्म ख्रिश्चन आहे. ५६ देश इस्लामिक रिपब्लिक आहेत. जपान, चीन, श्रीलंका, म्यानमारसारखी राष्ट्रे बौद्ध धर्मास डोक्यावर घेऊन उभी आहेत. पण जगाच्या पाठीवर एकही हिंदुराष्ट्र नसावे याची खंत आणि चीड ज्याच्या अंतरंगात नाही तो हिंदू म्हणून जगण्यास लायक नाही. एकमेव हिंदुराष्ट्र नेपाळही लाल माकडांनी मोडून ते निधर्मी केले व ज्यांच्याकडून निधर्मी हिंदुस्थानचे हिंदुराष्ट्र करण्याची अपेक्षा होती त्यांनी ‘युनो’त हिंदुस्थान निधर्मी असल्याची बांग दिली. हा विश्वासघातच आहे. भारतीय जनता पक्षाला देशभरात आणि आज खासकरून उत्तर प्रदेशात मिळालेले यश हा फक्त हिंदुत्वाचा डंका आहे. हा देश हिंदुत्ववाद्यांनी खुर्च्या उबवूनही निधर्मीवादाचा गुलामच राहणार असेल तर साबरमती एक्प्रेसमधील रामसेवकांच्या बलिदानाला अर्थ उरणार नाही. राममंदिरासाठी अयोध्येत मरण पत्करणाऱया वीरांचे मोल शून्य ठरेल. राममंदिराची उभारणी हे ढोंग व राजकारण ठरेल आणि गोवंशहत्या वगैरे थोतांड ठरून मतांसाठी हिंदूभक्तांना चेतविण्याचे षड्यंत्र ठरेल. ‘‘गर्व से कहो हम हिंदू है’वाल्यांचे राज्य सध्या देशात आले आहे’’ हे जगाला ओरडून सांगण्याची हीच वेळ असताना आम्ही अचानक ‘सेक्युलर’ कसे काय झालो? या सरकारवर शंभर कोटी हिंदूंतर्फे फसवणुकीचा, अब्रुनुकसानीचा गुन्हाच दाखल व्हायला हवा!

COMMENTS