राज्यात 13 लाख बोगस शेतकरी – मुख्यमंत्री

राज्यात 13 लाख बोगस शेतकरी – मुख्यमंत्री

बीड – राज्यात कर्जमाफीचा सावळा गोंधळ सुरु असताना अनेक शेतक-यांच्या खात्यावर अजून दमडीही जमा झाली नसताना मुख्यमंत्र्यांनी आज बीडमध्ये वादग्रस्त विधान केलं आहे. राज्यात सुमारे 13 लाख बोगस शेतक-यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय. या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी राज्यात सुमारे 10 लाख बोगस शेतकरी आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्यावर चौफेर टीका झाली होती. बीड जिल्ह्यात वडवणी येथे संरपंच मेळ्याव्यात मुख्यमंत्री बोलत होते.

कर्जमाफीसाठी ऑनलाईनची अट घातली त्यामुळे मागच्या वेळेसारखे घोळ यामध्ये झाले नाहीत असंही मुख्यमंत्री म्हणाले. ऑनलाईन पद्धतीमुळे बोगस शेतक-यांना लाभ मिळणार नाही असा दावाही त्यांनी केला. तसंच येत्या 4 डिसेंबर ला बीड च्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीचे पैसे जमा होतील असं आश्वासनही त्यांनी दिलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चावरही जोरदार टीका केली. गेल्या पंधरा वर्षात ज्यांनी फक्त डल्ला मारला ते आज हल्लाबोल आंदोलन करीत आहेत या शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला चढवला.

COMMENTS