“महाराष्ट्र मिशन 1-मिलियन” निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार
मुंबई – भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात येत्या 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉलखेळणार आहेत. राज्यातील सर्व शाळांमध्ये येत्या 15 सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळून महाराष्ट्रात फुटबॉल मिशन एक मिलियनच्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय होणार आहे.
येत्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ या उपक्रमाविषयी माहिती देण्यासाठी आज बॉम्बे जिमखाना येथे विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत येत्या 15 सप्टेंबर रोजी राज्यभर होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती श्री. तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने(FIFA U-17 World Cup India 2017) देशात 1 कोटी 10 लाख लोकांनी फुटबॉल खेळावा अशी कल्पना मांडली आहे. मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी “महाराष्ट्र मिशन 1-मिलियन” ची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत येत्या 15 सप्टेंबर 2017 रोजी राज्यभर 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी, युवक फुटबॉल खेळणार आहेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.
“महाराष्ट्र मिशन 1- मिलियन” योजनेअंतर्गत राज्यभरातील सुमारे 30 हजार शाळांमध्ये प्रत्येकी 3 याप्रमाणे 1 लाख फुटबॉलचे वाटप केले जात आहे. प्रत्येक शाळेने किमान 50 विद्यार्थी जे फुटबॉल खेळणार आहेत त्यांची नावे, पत्ते व इ. माहिती क्रीडा विभागाला कळविणे सुरु केले आहे. त्यामुळे अंदाजे सुमारे 15लाख विद्यार्थी या महोत्सवात सहभागी होतील असा विश्वास श्री.विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
मुलांनी ई गॅझेटपासून दूर राहावे हाच उददेश
ई-गॅझेटकडे शालेय विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला असून मुलांचे मैदानावर खेळण्याचे प्रमाण कमी होत आहे. आजची मुले विविध खेळाचे सामने मैदानावर कमी तर मोबाईल किंवा संगणकावर अधिक प्रमाणात खेळताना दिसतात. त्यामुळे मुलांनी ई-गेझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तर शिक्षण विभागाने १५ सप्टेंबर हा दिवस Non-Instructional Day दिला असल्यामुळे मोठया प्रमाणावर विद्यार्थी मैदानावर खेळायला किंवा खेळ पाहायला उपस्थित राहतील.
राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
येत्या शुक्रवारी, १५ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ९.३० वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे राज्यपाल चे.विदयासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “महाराष्ट्र मिशन १-मिलीयन” या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उदघाटन होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी बॉम्बे जिमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होणार आहेत. मुंबई जिमखाना येथे १५ सप्टेंबर रोजी मुलीचा संघ, मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, आदिवासी संघ, दिव्यांग विद्यार्थ्यांचा संघ असे फुटबॉलचे सामने येथे खेळले जाणार आहेत.
15 सप्टेंबरला होणार अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय
- मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली फुटबॉल खेळणार
- त्यासाठी शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे 200 मैदानांची आखणी.
- दिवसभर मुंबईतील मैदानांवर फुटबॉलचे सामने रंगणार आहेत.
- बुलढाणामध्ये आजोबा, मुलगा आणि नातू असे एकाच कुटुंबातील सदस्य फुटबॉलचा सामना खेळणार आहेत.
- विफा, एमडीएफए, खासगी क्लब, फुटबॉल मैदाने अशा सर्व ठिकाणी विविध संस्था-संघटनांच्या सहकार्याने मुंबई फुटबॉलमय होणार.
- बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील क्रीडा संकुलात टाटा कॅन्सर हॉस्पीटल मधील रूग्ण आणि विद्यार्थ्यांमध्येही फुटबॉल सामना रंगणार.
- ठाण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसमवेत आदिवासी पाड्यांवरदेखील फुटबॉलचा किक-ऑफ होणार.
- रायगडमध्ये नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये नगरपालिकांच्या सर्व शाळांमध्ये फुटबॉलचा खेळ रंगणार.
- अलिबागमध्ये तनिष्का महिला गटांचे फुटबॉल सामने होणार आहेत. सुमा शिरूर या आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार.
- सिंधुदुर्गामध्ये विद्यार्थ्यांचा बीच फुटबॉल याच्यासोबतच केंद्रीय कारागृहातील कर्मचारी आणि कैदी यांच्यातील फुटबॉलसामना आकर्षण ठरणार.
- फुटबॉलवर आधारित चित्रकला स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.
- कोल्हापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत न्यू पॅलेस मैदानावर 60 संघांचे सामने रंगणार असून त्यासाठी60 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
- शहरभर तालमी-मंडळांमधील फुटबॉल खेळण्यात येणार आहे. सोलापूरमध्ये सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये इंटर क्लास स्पर्धांचे आयोजन
- पुण्यामध्ये सव्वाशेहून अधिक फुटबॉल क्लब या उपक्रमात सहभागी. मध्यवर्ती कारागृहातील फुटबॉल सामना, पोलिसांचा फुटबॉल सामना, मुला-मुलींना शाळेत सोडण्यास येत असलेल्या रिक्षावाले काकांचा फुटबॉल सामना आणि फ्री-स्टाईल फुटबॉल जगलिंग या क्रीडाप्रकाराची प्रात्यक्षिके हे आकर्षण ठरणार.
- फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या स्पर्धेत जगभरातील टॉप 25 मध्ये स्थान मिळविलेला राजेश राठी या युवकाची प्रात्यक्षिके हे शनिवारवाड्यासमोरील या महोत्सवात आकर्षण ठरणार.
- उत्तर महाराष्ट्र-नाशिक विभागातील सुमारे एक लाख मुले-मुली 15 सप्टेंबरला फुटबॉल महोत्सवांमध्ये सहभागी होणार.
- यापूर्वीच दर रविवारी भरत असलेल्या फुटबॉल स्ट्रीट या जळगावमधील उपक्रमाने या विभागात महाराष्ट्र मिशन वन मिलियनबाबत जनजागृती केली आहे.
- अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळासह विभागीय क्रीडा संकुलामध्ये मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहे. विदर्भातील गोंदिया-गडचिरोली आदी दुर्गम व नक्षलग्रस्त भागांमध्ये देखील फुटबॉल पोचविण्यात आले आहेत.
- युवासेनेचे प्रमुख आणि फुटबॉल संघटनांचे पदाधिकारी आदित्य ठाकरे हे सुध्दा 15 सप्टेंबर रोजी मिशन फुटबॉलच्या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
- छत्रपती पुरस्कार विजेते तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कार विजेते राज्यात त्या त्या ठिकाणी खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलच्या सामन्यांमध्ये सहभागी होणार आहेत.
COMMENTS