16 तासांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

16 तासांनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

मुंबईतील ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर द्यावा आणि तोट्यात असलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेने मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी बेस्ट कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला होता. आज संप अखेर मागे घेण्यात आला आहे. संप मागे घेण्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि कामगार नेते शशांक राव यांची मध्यस्थीची भूमिका महत्वाची ठरली आहे. मातोश्रीवर झालेल्या चर्चेत बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले.

दुपारी साडे तीन वाजता मातोश्रीमध्ये झालेल्या बैठकीत बेस्ट कामगारांना १० तारखेपूर्वी वेतन मिळण्याबाबत, तसेच बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेत समाविष्ट करण्यावर चर्चा झाली. चर्चेदरम्यान बेस्ट कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी शिवसेनेने स्विकारल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले.

रविवारी सकाळपासून बेस्ट कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण, यातून कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापौर बंगल्यात कामगार नेते व पालिका आयुक्तांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही आयुक्तांकडून लेखी पत्र मिळाले नसल्यामुळे बेस्ट कामगार कृती समितीने संपाची घोषणा केली होती.  मातोश्रीवर अखेर आज दुपारी झालेल्या चर्चेनंतर बेस्ट कामगार कृती समितीने संप मागे घेत  असून कामगार लगेच कामावर रूजू होतील.  असे बेस्ट वर्कर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी जाहीर केले.

COMMENTS