नागपूर – राज्य सरकारमध्ये जंबो नोकरभरती केली जाणार असून यावर्षी 36 हजार तर पुढील वर्षी 36 हजार अशी एकूण 72 हजार पदं भरली जाणार आहेत. यामध्ये 72 हजारांपैकी 16 टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आमदार विनायक मेटे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलं आहे. यामध्ये त्यांनी मराठा समाजाला 16 टक्के जागा राखीव ठेवणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान आरक्षणवर दोन्ही सभागृहात कायदा केला असून सुप्रीम कोर्टात त्याला स्थगिती देण्यात आली आहे. सध्या मागासवर्गीय आयोगाची सुनावनी सुरु असून त्यानुसार अहवाल सुप्रीम कोर्टात सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण हा विषय सरकारच्या अखत्यारित नसून तो कोर्टाच्या अखत्यारित आहे. तसेच या नोकरभरतीमध्ये 16 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असून उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यावर हा बॅकलॉग भरला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS