सलगच्या पराभवामुळे पक्ष संघटनेला आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे लोकसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. दादर येथील राजगड कार्यालयात रविवारी मनसे नेत्यांची बैठक झाली. यात मेळाव्याच्या तयारीवर चर्चा करण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली.
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून या मेळाव्यांना सुरुवात होणार आहे. 27 एप्रिला दक्षिण मध्य मुंबई, 28 एप्रिला उत्तर पूर्व मुंबई ,29 एप्रिला उत्तर मुंबई, 02 ‘मे’ला उत्तर-पश्चिम मुंबई, 03 ‘मे’ ला उत्तर मध्य मुंबई, 04 किंवा 05 ‘मे’ ला दक्षिण मुंबई अशा प्रकारे मेळावे होणार असून पक्ष संघटन आणि पुढील राजकीय वाटचालीबाबत भूमिका मांडली जाणार आहे.
मनसेला लोकसभा, विधानसभा आणि आताच झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पक्षाच्या वर्धापन दिनी बोलताना, हा आपला शेवटचा पराभव असेल, असे राज म्हणाले होते. मी स्वत: तुमच्याशी संवाद साधायला येईन, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदारसंघांत कार्यकर्ते मेळावे होणार असून त्याला राज ठाकरे संबोधित करणार आहेत.
COMMENTS