नऊ गोळ्या लागूनही जिवंत ! वाचा सीआरपीएफच्या कमांडंटची थरारक बातमी

नऊ गोळ्या लागूनही जिवंत ! वाचा सीआरपीएफच्या कमांडंटची थरारक बातमी

दिल्ली – देव तारी  त्याला कोण मारी अशी आपल्याकडे एक म्हण आहे. त्याचाच प्रत्यय आला आहे सीआरपीएफचे कमांडंट चेतनकुमार चिताह यांच्याबाबतीत. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. ते कोमातून नुसतेच बाहेर आले नाहीतर ते आता चालू फिरु लागले आहेत. एम्सच्या डॉक्टरांनाही हा चम्तकारच वाटतोय.
काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यावेळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चेतनकुमार यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या. त्यापैकी एक गोळी त्यांच्या डोक्यालाही लागली होती. त्यामुळे ते कोमात गेले होते. त्यांच्यावर आधी श्रीनगरमधील लष्कराच्या रुग्णालयात तातडने उपचार करण्यात आले. पण नंतर पुढील उपचारासाठी त्यांना विमानाने दिल्लीत आणून एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यानंतर एम्समध्ये त्यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉक्टरांच्या प्रयत्नांना साथ देत ४५ वर्षाच्या चेतनकुमार यांनी मृत्यूवर मात केली आहे. दहशतवादी हल्ल्यात उजव्या डोळ्यावर भुवईच्या ठिकाणी गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. दोन महिन्यानंतर ते कोमातून बाहेर आले असून आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. चेतनकुमार यांना सर्व समजतंय आणि त्यांना बोलताही येतंय. यामुळे सर्व तपासणीनंतर चेतनकुमार यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या डाव्या डोळ्याला झालेली दुखापत डॉक्टरांनी सुधारली. पण खोलवर झालेल्या जखमेमुळे त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी मात्र  गेली.

COMMENTS