बाबरी मशीदप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह 12 आरोपींवर बाबरी पाडण्याचा कट रचल्याचा आरोप निश्चित केला. त्यामुळे आता या सर्वांवर गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालणार आहे. न्यायालयाने आज सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी एफआयआरमध्ये आडवाणी, मुरली मनोहर जोशी व उमा भारतींसह12 जणांची नावे होती. सीबीआय न्यायालयाने 2001मध्ये कटाच्या आरोपातून आडवाणींसह इतरांची नावे वगळली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने 2010मध्ये त्या निकालावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, गेल्याच महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हा खटला नव्याने सुरू केला आहे. सर्व आरोपींवर महिन्याच्या आत आरोप निश्चित करण्याचे निर्देश सीबीआयच्या विशेष न्यायालयाला दिले होते.
बाबरी पाडण्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे सांगून आडवाणींसह सर्व आरोपींनी या खटल्यातून मुक्त करण्याची मागणी (डिस्चार्ज अर्ज) न्यायालयाकडे केली. त्या अर्जावर विचार करण्यासाठी न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला. तसेच, आरोपींना जामीन मंजूर केला. मात्र, काही वेळातच न्यायालयाने आरोपींचा डिस्चार्ज अर्ज फेटाळला व आरोप निश्चित केले.
दरम्यान, ‘न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करणे उचित ठरणार नाही. बाबरी खटला ही एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. आमचे नेते निष्कलंक असून या प्रकरणातून सर्वांची निर्दोष सुटका होईल, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व्यंकय्या नायडू यांनी दिली.
COMMENTS