जातीवाद, धर्मवाद व असहिष्णुतेविरोधात लढा देण्याची गरज – सुशिलकुमार शिंदे
महाराष्ट्र सरकारचा ऑगस्ट क्रांती मैदानात एकही कार्यक्रम का नाही? – मोहन प्रकाश
पूर्वजांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पुन्हा लढा देण्याची वेळ -अशोक चव्हाण
मुंबई – भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील निर्णायक लढा असणा-या चले जाव आंदोलनाला 75 वर्ष झाल्यानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. देशाचे माजी गृहमंत्री आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशिलकुमार शिंदे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला.
ऑगस्ट क्रांती मैदान आमच्यासाठी तिर्थक्षेत्र असून ‘चले जाव’ आंदोलनाला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता जातीवाद, धर्मवाद असहिष्णुतेविरोधात लढा देण्याची गरज आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे नेते लढले त्यांचे नाव घ्यायला विद्यमान सरकारला लाज वाटते, अशी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली. ७५ वर्षापूर्वी या मैदानात पेटलेल्या ठिणगीचा वणवा झाला आणि इंग्रजांना भारत सोडून जावे लागले. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वातंत्र्यासाठी सुरु केलेल्या चले जाव आंदोलनाला जनसंघाचे संस्थापक आणि भाजपचे आदर्श असणा-या शामाप्रसाद मुखर्जी यांनी विरोध केला होता. विद्यमान सरकार त्यांच्या विचाराचे असल्यानेच आज महाराष्ट्र सरकारचा एकही कार्यक्रम नाही असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश म्हणाले.
यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, 75 वर्षापूर्वी याच ऐतिहासीक मैदानातून स्वातंत्र्यांच्या निर्णायक लढ्याची सुरुवात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली झाली होती. देशातल्या नागरिकांनी जात पात विसरून या लढ्यात सहभाग घेतला. अनेकांनी हौतात्म्य पत्करले, तुरुंगवास भोगला त्यांच्या त्यागामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. या सर्वांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. देशातील परस्थिती पाहता पूर्वजांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी पुन्हा लढा देण्याची वेळ आली आहे. ज्यांनी स्वातंत्र्य लढा आणि महात्मा गांधीजींच्या विरोधात कारस्थाने केली तेच आज सत्तेवर बसून देशात काय करायचे काय नाही करायचे ते सांगत आहेत. लोकशाही काय असते हे भाजपला शिकविण्याची गरज आहे,असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
विशिष्ट समाजाबाबत तिरस्कार पसरविण्याचे काम सत्ताधारी करित आहेत. देशातील धर्मांध शक्तींना चले जाव असे सांगण्यासाठी लढा उभारण्याची आवश्यकता आहे असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम म्हणाले .
या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आ. पतंगराव कदम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम आ. सतेज पाटील आ. अमिन पटेल आ. भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम, माजी आ. अशोक जाधव प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे,प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे,अतुल लोंढे यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS