‘आम्हाला देशाबाहेर काढा, तरीही वंदे मातरम् म्हणणार नाही, असे खळबळजनक विधान समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनी केले आहे. मुस्लीम समाजात एकच देव आहे, त्या अल्लाची आम्ही इबादत करतो असे सांगून, अल्लाशिवाय आम्ही कुणालाही वंदन करत नाही, अशी प्रतिक्रिया आझमी यांनी दिली आहे.
मद्रास उच्च न्यायालयात वंदे मातरम् बाबत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमिवर, मुंबईत पत्रकारांशी बोलताना आझमी यांनी हे विधन केले आहे. ते पुढे म्हणाले, की आम्ही या देशात राहतो. हा देश धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रत्येकाला आपली प्रार्थना करण्याचा अधिकार आहे, पण कुणी कुणावर धार्मिक बाबी लादू शकत नाही, असे ते म्हणाले.
दुसरीकडे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. गळ्यावर तलवार चालवा किंवा गोळी मारा पण वंदे मातरम् बोलणार नाही, असे पठाण म्हणाले.
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अबु आझमी यांना सडेतोड उत्तर दिले. ‘मनातच पाकिस्तान आहे, ते केवळ भारतात राहतात’. वंदे मातरम् हे राष्ट्रगीत नसले तरी राष्ट्रगान नक्कीच आहे, त्याचा अपमान कुणी करू नये, ज्यांना करायचा आहे, त्यांनी स्वतः देश सोडून जावे, असे रावते म्हणाले.
COMMENTS