मुंबई – 9 ऑगस्ट या क्रांतिदिनी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. या महामोर्चाची राज्यभरात जय्यत तयारी सुरु झाली असून विविध जिल्ह्यांतील समन्वय समितीच्या माध्यमातून आजपर्यंत सुमारे 10 लाख मराठ्यांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्याची माहिती आहे, त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील गाड्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून येणार असल्याने एका लेनवरून मराठा क्रांती मोर्चाची वाहने राहतील यासाठी समन्वय समितीकडून सूचना देण्यात आल्या आहेत. तर, मुंबईत चेंबूर ते डॉकयार्ड दरम्यानची संपूर्ण मार्गिका मोर्चकऱ्यांच्या वाहनांनी व्यापण्याची शक्यता आहे. हा महामोर्चा भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान या मार्गावरून जाणार असून यासाठी दोन हजार मराठा स्वयंसेवकांची टीम मोर्चाचे नियंत्रण करण्यासाठी सज्ज आहे. मराठा रेल स्वयंसेवक देखील मुंबईतील तिन्ही लोकल मार्गांवर प्रत्येक स्थानकावर तैनात राहणार आहेत. मुंबईत बीपीटी सिमेंट यार्ड व वडाळा ट्रक टर्मिनल या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोर्चात प्रचंड संख्येने मराठा समाज सहभागी होणार असल्याने दक्षिण मुंबईत सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत वाहतूक यंत्रणेवर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे.
COMMENTS