मुंबई – राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे अडचणीत सापडले आहेत. विनोद तावडे यांचे ओएसडी असलेले डॉ. चारुदत्त शिंदे यांनी आपल्याकडून एक लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप अल्पसंख्यांक विभागातील कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी केला आहे. तसं पत्र त्यांनी अल्पसंख्यांक विभागाच्या प्रधान सचिवांना दिलं आहे. याप्रकरणी साळुंखे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर सरकार चारुदत्त शिंदे यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
विनोद तावडेंच्या खात्यातील कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी अल्पसंख्यांक खात्यातील एक शासकीय आदेश, ज्यात कंत्राटदारांना काम देण्याचे आदेशच निघाले नव्हते, त्या कंत्राटदारांना काम देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात शशिकांत साळुंखे यांना निलंबित करण्यात आले आहे. शशिकांत साळुंखे यांनी प्रधान सचिवांना लिहिलेल्या पत्रात विनोद तावडे यांचे सचिव चारुदत्त शिंदे यांनी आपल्याला नाव टाकण्यास सांगितल्याचं नमूद केलं. शिवाय शिंदे यांनी एक लाख रुपये मगितल्याचा आरोपही केला. चारुदत्त शिंदे हे केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांचे नातेवाईक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला. या प्रकरणात कारवाई न केल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे.
अल्पसंख्यांक विभागाकडून रस्ते बांधणी, शाळा आणि मश्जिद दुरुस्तीसाठी निधी दिला जातो. 31 मार्च 2017 रोजी शशिकांत साळुंखे यांनी या कामांचा जीआर प्रसिद्ध केला. मात्र या जीआरमध्ये असलेल्या कामांना या खात्याच्या मंत्री आणि सचिवांनी मंजुरीच दिली नव्हती. याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर जी बाब समोर आली ती धक्कादायक आहे. 31 मार्च 2017 रोजी 2 कोटी 60 लाख रुपयांची नऊ जिल्ह्याती 26 कामे मंजूर करण्यात आली. या कामांची यादी अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव आणि मंत्र्यांच्या सहीने जीआर काढण्यासाठी कक्ष अधिकाऱ्याकडे येते. मात्र कक्ष अधिकारी शशिकांत साळुंखे यांनी काढलेल्या जीआरमध्ये मंजूर केलेल्या कामांऐवजी इतर कंत्राटदारांच्या कामांचा समावेश करण्यात आला. ही बाब आपण डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या सांगण्यावरून केल्याचा दावा साळुंखे यांनी प्रधान सचिवांना लिहलेल्या पत्रांमध्ये केला आहे. तसेच या प्रकरणात आपण डॉ. शिंदेंना मंत्रालयातच 1 लाख रुपये दिल्याचा दावाही साळुंखे यांनी केलाय. याप्रकरणी शिंदे यांच्यावर कारवाईची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
या प्रकरणी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आरोप फेटाळले आहेत. कक्ष अधिकाऱ्यांने जे आरोप केले आहेत ते सिद्ध केलेले नाहीत. त्यांनी आरोप सिद्ध केले तर कारवाई केली जाईल, असा दावा तावडे यांनी केली आहे.
COMMENTS