मुंबई : शिवसेनेने सहा नगरसेवक फोडल्यानंतर मनसेत आता फक्त एकच नगरसेवक राहिला आहे. त्यामुळे मनसेवर मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय सोडण्याची वेळ आली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 7 नगरसेवक असलेल्या मनसेला सुरुवातीला महापालिका इमारतीत पक्ष कार्यालय देण्यात आले होते. मात्र, आता एकच नगरसेवक राहिल्याने मनसेचं पक्ष कार्यालय काढून घेतलं जाऊ शकतं.
दुसरीकडे शिवसेनेच्या या खेळीने त्यांना सभागृहात महत्त्वाचे प्रस्ताव पास करुन घेणे आता सोपं जाणार आहे. याआधी कोणताही प्रस्ताव पास करुन घेण्यासाठी मनसे किंवा भाजपची मनधरणी करावी लागत होती. मात्र, आता या खेळीनंतर शिवसेनेला मनसेवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
दरम्यान, काल मुंबई महापालिकेतील मनसेच्या 7 पैकी 6 नगरसेवकांना शिवसेनेत सामील करून घेत, यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्याच्या भाजपच्या मनसुब्यांना सुरूंग लागला आहे. मनसे सोडणाऱ्या 6 नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे गटनोंदणीसाठी तयारी सुरू केली आहे. पण पक्षाच्या परवानगीशिवाय नगरसेवक गट स्थापन करू शकत नाही असा दावा मनसेनं केला होता. काल मनसेच्या सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला.
COMMENTS