मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. तसेच, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनीही त्यांचे एक महिन्याचे वेतन या सहायता निधीला दिले आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बाळासाहेबांचे व्यक्तिमत्व सर्वांना स्फूर्ती देणारे आहे. त्यांनी समाजातल्या तळागाळातील जनतेला नेतृत्व दिले. त्यांचे स्फूर्तिदायक विचार जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे राष्ट्रीय स्मारक आकार घेत आहे. महापौर बंगल्यात होणाऱ्या या स्मारकासाठी सर्व परवानग्या आम्ही मिळवल्या आहेत. या संकेतस्थळाच्या माध्यमाने बाळासाहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवता येतील. बाळासाहेबांच्या स्मारकाला सर्व मदत आम्ही करू. केवळ एक ट्रस्टचे स्मारक नाही, तर साऱ्या महाराष्ट्राचे हे स्मारक आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेला निधी शेतकऱ्यांसाठी वापरला जाईल. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांच्या विचारांची मी प्रेरणा घेतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
www.balasahebthackerayrashtriysmarak.in या नावाने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांची जुनी गाजलेली व्यंगचित्र, लेख, भाषणे आणि अग्रलेखही प्रकाशित केली जाणार आहेत.
COMMENTS