मुंबई – शहेजाद पुनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत केलेले वक्तव्य हे केवळ सवंग प्रसिध्दीसाठी आहे. ते काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधीसुध्दा नाहीत त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव शहजाद पुनावाला यांनी राहुल गांधींच्या निवडीबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केलेत. ते म्हणाले, ‘यह सिलेक्शन है, इलेक्शन नही’. या निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यावर अशोक चव्हाण म्हणाले की, शहेजाद पुनावाला यांनी चमकोगिरी करण्याशिवाय काँग्रेस पक्षासाठी काहीही काम केलेले नाही ते निष्क्रीय आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे सुरु आहे. खा. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी अशी तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त प्रदेश प्रतिनिधींनी राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी असा ठराव एकमताने मंजूर केला आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पण शहेजाद पुनावाला हे केवळ प्रसिध्दीच्या हव्यासापोटी बेताल वक्तव्य करित आहेत त्यांच्या वक्तव्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निषेध करित आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.
COMMENTS