दिल्ली – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. देशभरात भ्रष्टचारामध्ये वाढ होत असून याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप करत 23 मार्चरोजी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णांनी मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.
पंतप्रधान मोदी आणि पीएमओ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांना 30 पत्र लिहिली परंतु यापैकी एकाही पत्राचं उत्तर त्यांच्याकडून मिळालं नसल्याची खंत त्यावेळी अण्णांनी व्यक्त केली आहे. देशभरात भ्रष्टाचार वाढत आहे. याबाबत पंतप्रधानांकडून दखल घेतली जात नसून त्यांना अहंकार आला असल्याचंही अण्णा म्हणालेत.
नरेंद्र मोदींनी प्रत्येक राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु ते आश्वासन त्यांनी पूर्ण केलं नसल्याचं अण्णांनी म्हटलं आहे. तसेच खासदार, सरकारी कर्मचारी यांची संपत्ती जाहीर करण्याचे लोकपाल/लोकायुक्त कायद्यात होते. परंत ते कलम 44 देखील मोदी सरकारने काढून टाकले आहे. मोदी म्हणतात भ्रष्टाचार विरोधी लढाई लढणार पण प्रत्यक्षात भ्रष्टाचार विरोधी कायदा कमकुवत करण्याचे काम त्यांनी केले आहे.
देशभरात हजारो शेतक-यांच्या आत्महत्या
22 वर्षात 12 लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या परंतु मोदी सरकारने 3 वर्षात शेतक-यांसाठी काहीच केले नाही. मोदी सरकारला उद्योगपतींची चिंता आहे परंतु त्यांना शेतक-यांची काहीही चिंता नसल्याचं त्यावेळी अण्णा यांनी म्हटलं आहे.
COMMENTS