मुंबई – गुरुवारी म्हणजेच 7 डिसेंबरला होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय वातावरण सध्या जोरदार तापत आहे. याच पार्श्वभूमिवर विरोधी पक्षांनीही सावधानतेचा पवित्रा घेतला असल्याचं पहावयास मिळत आहे. आपली मतं फुटणार नाहीत याची विशेष खबरदारी विरोधकांकडून घेतली जात आहे. त्यासाठी आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली जाणार आहे.
आज रात्री मुंबईत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांची मतं फुटली होती, त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून खबरदारी घेतली जात आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांची 16 मते फुटली होती. तसेच गुरुवारी होणा-या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीतही विरोधकांची मतं फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्याचं पार्श्वभमीवर पक्षश्रेष्ठींनी सर्व आमदारांची बैठक घेऊन काँग्रेसच्या दिलीप मानेंनाच निवडून आणण्याचे आदेश दिले आहेत.
एकूणच विरोधकांनी घेतलेला हा खबरदारीचा पवित्रा यशस्वी होणार का?, हे या निवडणुकीच्या निकालानंतरच सिद्ध होईल.
COMMENTS